Jhopalyawarchi Geetaझोंपाळ्यावरची गीता

 

चैत्र शुद्ध प्रतिपदा,

शके १९३३ (गुढीपाडवा)

४ एप्रिल २०११ 

 

गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता ||

पडतां रडतां घेई, उचलूनि कडेवरी ||

 

या शब्दांत विनोबांनी श्रीमद्भगवद्गीतेचं महत्त्व सांगितलंय. मानवी जीवनाचं सार सांगितलेला हा महान ग्रंथ जाणून घ्यायचे, अभ्यासायचे प्रयत्न युगानुयुगे सुरू आहेत. मात्र प्रत्येक वेळी गीता वाचताना, अभ्यासताना त्यातील नवे अर्थ, त्याचे वैविध्यपूर्ण पैलू, पूर्वी न कळलेले आयाम समोर येतात, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. गीर्वाणवाणीतील हे ज्ञान सर्वांना उमजावं, याकरिता विनोबांनी सुगम मराठीत गीताईची रचना केली.

 

झोपाळ्यावरची गीता हे देखील गीतेचं असंच एक सहज समजण्याजोगं रूप आहे. माझ्या आजोबांचं (कै. बाळकृष्ण केशव करंबेळकर) व्यक्तिमत्त्व आध्यात्मिक होतं. गीतेसारख्या विषयांचा त्यांचा अभ्यास होता. सात-आठ महिन्यांपूर्वी त्यांच्या जुन्या कागदपत्रांत झोपाळ्यावरची गीता ही एक छोटी, दुर्मिळ पुस्तिका सापडली. आजोबा शिक्षक होते. बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांनी गीताजयंतीनिमित्त, शाळेतील मुलांचे अठरा गट पाडून त्यांच्याकडून गीतेचे अठरा अध्याय पाठ करून घेण्याचा उपक्रम राबवला होता. त्याचा गौरव म्हणून तत्कालीन आमदार श्री. शशिशेखर आठल्ये गुरुजी यांनी झोपाळ्यावरची गीता त्यांना भेट म्हणून दिली होती, अशी आठवण माझ्या मामाने (श्री. आनंद करंबेळकर, मु. पो. मठ, ता. लांजा, जि. रत्नागिरी) सांगितली.

 या झोपाळ्यावरच्या गीतेतील श्लोक अत्यंत सुलभ भाषेत लिहिलेले आहेत. त्याला झोपाळ्यावरची गीता असं का म्हटलंय, असा प्रश्न मनात आला. त्यावर मामानं सांगितलं, की पूर्वी मुलींची लग्नं वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षी होत. चैत्रगौरीच्या निमित्ताने त्या माहेरी येत, त्यावेळी झाडांना किंवा अंगणात झुले (झोपाळे) बांधून त्यावर त्यांचे खेळ चालत. त्यावेळी वेगवेगळी गाणी म्हटली जात. त्याबरोबरच या मुलींनी जर गीता म्हटली तर लहान वयात त्यांना चांगलं ज्ञान मिळू शकेल, असा विचार पुढे आला. पण संस्कृतातली गीता म्हणणं तसं अवघड होतं. त्यामुळे गीतेची सुलभ भाषेत रचना करून त्याला झोपाळ्यावरची गीता असं नाव दिलं गेलं.  दत्तात्रेय अनंत आपटे ऊर्फ अनंततनय (इ. स. १८७९ ते १९२९) यांनी झोपाळ्यावरच्या गीतेची रचना केली आहे.

आजोबांच्या संग्रहात सापडलेल्या झोपाळ्यावरच्या गीतेच्या पुस्तिकेत चार पाने नव्हती. त्यामुळे मूळ पुस्तिका आणखी कोणाकडे आहे का, याविषयी आमचा शोध सुरू होता. त्यात फारसे यश न आल्याने झोपाळ्यावरच्या गीतेचा हा दुर्मिळ आणि अनमोल ठेवा, निदान आहे तेवढा तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी काय करता येईल, असा विचार सुरू झाला. त्यातूनच झोपाळ्यावरच्या गीतेची स्वतंत्र वेबसाईट तयार करण्याची कल्पना सुचली. ही वेबसाइट मार्गशीर्ष शुक्ल एकादशी, शके १९३२ (१७ डिसेंबर २०१०) अर्थात गीता जयंतीच्या दिवशी सुरू केली. आणखी कोणाकडे ही पुस्तिका असेल, तर माहिती द्यावी असे आवाहन त्यात केले होते. नंतर काही दिवसांत महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीत मराठी राजभाषादिनानिमित्ताने या झोपाळ्यावरच्या गीतेवरील लेख लिहिला होता आणि त्यात या साइटचीही माहिती दिली होती. तो लेख छापून आल्यानंतर पुण्यातील साहित्यिका सरिता पदकी यांच्याकडे ही पुस्तिका असल्याचा संदर्भ मिळाला. त्यानंतर त्यांच्या सहकार्याने, उर्वरित चार पानांमधील ओव्याही आम्हाला उपलब्ध झाल्या. त्यामुळे आता संपूर्ण झोपाळ्यावरची गीता, पुस्तिकेच्या मूळ प्रस्तावना वेबसाइटवर उपलब्ध करताना आनंद होतो आहे.

झोपाळ्यावरच्या गीतेच्या तीन आवृत्त्या (शके १८३९, शके १८४१, शके १८५०) निघाल्या होत्या. शंकर नरहर जोशी यांच्या चित्रशाळा प्रेसने त्या प्रकाशित केल्या होत्या. त्या वेळी त्याची किंमत केवळ चार आणे एवढी होती. लोकमान्य टिळकांनी केलेल्या गीतारहस्यच्या लेखनपूर्तीला ३० मार्च २०११ला शंभर वर्षे पूर्ण झाली. आणखी सहा वर्षांत झोपाळ्यावरच्या गीतेच्या रचनेला शंभर वर्षे पूर्ण होतील.   

माझा काही गीता या विषयावर अभ्यास नाही, पण जे अभ्यास करणाऱे आहेत त्यांच्यापर्यंत हा एक वेगळा विषय पोचावा, एवढ्यासाठीच हा खटाटोप. मराठी भाषेचा हा खूप मोठा आणि मौल्यवान ठेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, असाही एक उद्देश त्यामागे आहे. गीतेचा तुलनात्मक अभ्यास करणं शक्य व्हावं, यासाठी मूळ भगवद्गीता, विनोबांची गीताईदेखील या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. या उपक्रमाबाबतच्या आपल्या सूचनांचंही स्वागत आहे.   


 

ताजा कलम :

झोंपाळ्यावरची गीता केवळ ऑनलाइन माध्यमापुरती मर्यादित न राहावी या हेतूने, एक ऑगस्ट २०१५ रोजी ती पुस्तिका स्वरूपात प्रकाशित करण्यात आली आहे. त्या संदर्भातील माहितीसाठी इथे क्लिक करा. या पुस्तिकेमध्ये संदर्भासहित अभ्यासाकरिता मूळ भगवद्गीताही देण्यात आली आहे. या पु्स्तिकेची किंमत केवळ साठ रुपये असून, ते बुकगंगा डॉट कॉम या वेबसाइटवरूही खरेदी करता येऊ शकेल.

 

 

  ||श्रीकृष्णार्पणमस्तु ||

 

    
 

 

अनिकेत कोनकर, पुणे

मोबाईल : (+ ९१) ९८५०८८०११९,

(+ ९१) ९४२३२९२१६२

ई-मेल : abkonkar@gmail.com

फेसबुक : http://www.facebook.com/aniket.konkar

ब्लॉग : http://manspandane.blogspot.com